स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी मुंबईत महिलांचे आंदोलन
मुंबईत महिलांसाठी मोफत, स्वच्छ, सुरक्षित आणि स्वतंत्र असे सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृह असावे या मागणीसाठी मुंबईतील महिलांनी आझाद मैदानात निदर्शने करीत आंदोलन केले. मुंबईसारख्या महानगरीत महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत याचा त्रास महिलांच्या आरोग्यावर होवू लागला आहे. या संदर्भात अनेक तक्रारीही मुंबई महानगरपालिकेकडे दाखल करण्यात आल्या. मुंबईतील ३० सामाजिक संस्था महिलांसाठी मोफत, स्वच्छ, सुरक्षित स्वच्छतागृहाच्या मागणीसाठी गेले वर्षभर महानगरपालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु पालिकेतील सत्ताधारी आणि ढिम्म प्रशासन मात्र या मागणीकडे कानाडोळा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि या सुन्न पालिकेला जागे करण्यासाठी मुंबई पालिकेसमोरील आझाद मैदानात महिलांनी एकत्र येवून निदर्शने केली.
महिलांना हवे मोफत, स्वच्छ, सुरक्षित आणि स्वतंत्र स्वच्छतागृह
महिलांसाठी मोफत, स्वच्छ, सुरक्षित आणि स्वतंत्र असे सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृह असावे. सार्वजनिक स्वच्छतागृहाचे व्यवस्थापन महिलांच्या सामाजिक संस्थांना द्यावे. प्रत्येक दोन किलोमीटर परिसरात स्वतंत्र असे सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृह असावे.
शहर नियोजन आराखड्यात महिलांसाठी स्वतंत्र असे सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृहाची अमलबजावणी करावी. अशा मागण्याचे निवेदन मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांना देण्यात आले. यावेळी राहुल शेवाळे म्हणाले सार्वजनिक स्वच्छतागृहाचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थाना महिलांकडून कोणतेही शुल्क आकारू नये असे सांगितले आहे , यानंतरही ज्या संस्था शुल्क आकारणी करतील त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
महिलांचा कोंडमारा होतो
लाखो -करोडो रुपये नागरी सुविधावर खर्च केल्याचा बहाणा करणाऱ्या मुंबई महानगर पालिकेवर महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईत झालेल्या आंदोलनामुळे मात्र पालिकेच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनाला हरताळ फासल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबईत महिला कामा निमित्ताने घराबाहेर असल्याने त्यांना स्वच्छतागृहाची गरच भासते. मुंबईत पुरुषांसाठी साधारण २८४९ सुलभ शौचालये आहेत मात्र महिलांसाठी स्वतंत्र शौचालय नाही. पण रेल्वे स्थानकावरची स्वच्छतागृहे सदानकाळ बंद तर काही अस्वच्छ, तुटलेली; अशीच काही स्थिती आहे सुलभ शौचालयांची. तर काही ठिकाणी सुलभ शौचालय वापरण्यासाठी पैसेही आकारले जातात. त्यामुळे महिलांचा कोंडमारा होतो. यासाठीच महिलांनी निदर्शनाचे हत्यार उपसले. या पुढे कार्यवाही न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराहि या आंदोलन कर्त्यांनी दिला आहे. आता प्रशासन मोठ्या आंदोलनाची वाट पाहणार काय ? 